रविवार..
एक सुट्टीचा दिवस..
खरंच सुट्टीचा आहे का तो?
असं म्हणतात,
सुट्टीच्या दिवशी रोजच्यापेक्षा वेगळं काही करावं!
म्हणजे काय?
वेगळं काम?
जास्तीचं काम?
का नाही आपण पूर्ण सुट्टी घेत?
आपल्याला ऑफिसची कामं तर नसतात..
बिझी शेड्युल मुळे रखडलेली इतर कामं करावीत, तर सरकारी कार्यालयं, बॅंका सुद्धा बंद असतात.
बरं, घरी बसून सुद्धा रोजच्या रोज करावी लागणारी कामं असतातच.. तरी पण रिकामेपणा आपल्याला सहन होत नाही.. आपण आयुष्यात काहीच केलं नाही, सगळं उद्यावर ढकलत आलो, असे छळवादी विचार नेमके अशा आरामाच्या दिवशीच डोकं वर काढतात..पण काहीच केलं नाही, म्हणजे नक्की काय करायला हवं होतं, हे सुद्धा कधी कधी आपल्याला माहीत नसतं.. असंच सकाळचा चहा पिता पिता सुन्न बसलेलो असताना, आपल्याला आपलं शेंडेफळ तंगड्या वर करून मोबाईल घेऊन बसलेलं दिसतं.
आपला पारा चढतो. आपण काहीच केलं नाही तसं त्यानेही करू नये, अशी इच्छा असते आपली, पण आपल्याला तेही धड व्यक्त करता येत नाही..
मग आपण घरातली कामं काढतो.
अतिशय फालतू अशी कामं..
अतिशय फालतू अशी कामं..
ते कपडे घडी घालून ठेवलेत, तेवढेही कपाटात ठेवता येत नाहीत का रे तुम्हांला, असं म्हणत म्हणत तिकडे जातो, आणि कपाट उघडून त्याने विचारपूर्वक केलेली पसाऱ्याची मांडणी धडाधड फरशीवर आणतो.
किती हा पसारा, काय सापडेल का यात शोधायला गेल्यावर.. ही बघ ही पॅन्ट सापडत नव्हती म्हणून आरडाओरडा चालला होता त्यादिवशी, कुठल्या कोपऱ्यात आहे बघ, टाक ती धुवायला, ही पॅन्ट का नाही घालत हल्ली? टाईट व्हायला लागली? दाखव मला घालून.. किंमत नाही राहिली तुम्हांला कसली.. सगळं आयतं मिळतंय ना.
दोनच मिनिटांपूर्वी मस्त रविवारचा आस्वाद घेणारा तो बिचारा आता, "काय गं कशाला तू सुट्टीच्या दिवशी फुकट कामं काढत बसतेस.." म्हणून चुक चुकत आपल्यासमोर फॅशन परेड करत असतो.
मग आपण कपाट आवरतोय म्हणून घरातल्या इतरांना जेवणाच्या तयारीचे आदेश दिले जातात. सगळे जण चुकचुकत बुडं हलवतात आणि नारळ खवणं, पीठ मळणं वगैरे कामाला लागतात.
यथावकाश, दुपार टळून गेल्यावर,जेवण बनवायला आपण उठतो, आणि ते नीट लावलेलं कपाट पाहून स्वतःला एक शाबासकी देतो. आपण आयुष्यात काहीच केलं नाही, पण सुट्टीच्या दिवशी सुद्धा अराम न करता आपल्या बेशिस्त अपत्याचं कपाट नीट लावलं, हीच काय ती आपली अचिवमेंट असते.
एव्हाना दुसऱ्या अपत्याने धडा घेऊन चुपचाप आपले कपडे ठेवलेले असतात. दिवस मावळेपर्यंत सगळा परिवार आपण एखाद्या गोष्टीने ट्रिगर होऊन एखादं नवीन काम काढणार नाही याची काळजी घेत राहतो.
रात्री जेवल्यावर जरा पाठ टेकायला जावं, तर तिथं कुठेतरी आपल्याला वाचायचं राहून गेलेलं पुस्तक दिसतं, पण आता उद्या सोमवार.. रेल्वेचा पास काढायला उद्या लवकर निघावं लागणार, या विचारांनी आपण चुपचाप पाठ टेकतो.
झालं! संपला रविवार!
देवाने दिलेल्या आणि आपण स्वीकारलेल्या या सोन्यासारख्या दिवसाचा आपण मस्त कामगार दिन केलेला असतो.
रविवार..
खरंतर एक सुट्टीचा दिवस..
या सुट्टीच्या दिवशीसुद्धा आपण स्वस्थ बसून पूर्ण वर्तमानपत्र वाचत नाही,
नवीन पुस्तक वाचायला घेत नाही,
काही नवीन लिहीत नाही,
घरातली एखादी भिंत सजवत नाही,
वेगळी गाणी ऐकत नाही,
नवीन पुस्तक वाचायला घेत नाही,
काही नवीन लिहीत नाही,
घरातली एखादी भिंत सजवत नाही,
वेगळी गाणी ऐकत नाही,
एखादा नवा चित्रपट पाहत नाही,
अहो एवढंच काय,
अहो एवढंच काय,
सकाळी उशिरा उठलेलो असतो म्हणून
दुपारी मस्त अंधार करून छान झोपसुद्धा काढत नाही..
का ss ही नाही !
आपण फक्त रद्दी काढतो..
पेपर, प्लॅस्टिक, भंगार आणि स्वप्नांची...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा