बुधवार, ११ जुलै, २०१८

थेंब

थेंब...
या शब्दातच किती ओलावा आहे!

'थ' चं टप्पोरं डोकं,
त्यावर डोंगरउतारासारखी मात्रा,
त्यावर दवबिंदू सारखा अनुस्वार !

फक्त शब्दरचनेच्या निमित्ताने सोबतीला आलेला ब... 
अनुस्वाराच्या वर्षावात भिजायला आल्यासारखा...

काय मजा आहे ना?
तर असा हा एक थेंब!
आपल्या प्रत्येकाचा याबाबतीतला 
आपला आपला असा अनुभव असणार.

कोण्या एका द्रवाचा थेंब..

कोणा दुष्काळग्रस्तासाठी पाण्याची ओंजळ,
कोणा अपघातग्रस्तासाठी लाल औषधाचा बोळा, 
कोणा सैनिकांसाठी शत्रूच्या रक्ताची धार,
कोणा प्रियकरासाठी प्रेयसीच्या अश्रूंचा बांध,
कोणा कष्टकऱ्यासाठी चहाचे दोन घोट,
कोणा सोवळेकरासाठी गोमूत्राचा शिडकावा,
कोणा नवजातासाठी आईचा पान्हा,
तर कोणा वैकुंठवासीसाठी गंगाजलाचे चार थेंब...

थेंबाथेंबांनी बनलेले हे सर्व एकक,
ज्याची त्याची तहान भागवून जातात..

माझी तहान भागवणारा एकच !
पावसाचा माझ्या अंगावर पडणारा पहिला-वहिला थेंब!

कातडीसुद्धा काढून ठेवावी असं वाटायला लावणारा उन्हाळा 
म्हणजे त्या थेंबाच्या आगमनाचीच सूचना आहे, 
असं समजून चालायचं, 
की उन्हाळ्याचा त्रास जर कमी होतो.

मग एक पिटुकला थेंब येतो आकाशातून,
एक गारेगार संदेश घेऊन..
आपल्या सगळ्या सोबत्यांना बोलावतो जमिनीवर खेळायला..
आकाशातून बाबा गर्जत असतात, 
आई कडाडत असते,
पण हे थेंब काही त्यांचा खेळ थांबवत नाहीत.

ते कधी हलके हलके वाऱ्यावर तरंगत येतात,
कधी एकमेकांशी स्पर्धा असल्यासारखे धावत येतात,
कधी अलगद जाऊन गवतात लपतात,
तर कधी जोरदार येऊन कातळावर आदळतात..
पडतात, धडपडतात, कधी कधी तर वाहून जातात, 
पण मस्ती करायची थांबवत नाहीत.

असे हे खोडकर थेंब..
माझे खूप खूप लाडके..

पण आकाशातले बाबा पुढे जायला लागले, 
की निमूटपणे त्यांच्यामागे जातात!
पुन्हा येतात, 
पुन्हा पुन्हा येतात..
मागे बऱ्याच आठवणीही ठेवून जातात..


त्या पहिल्या वहिल्या थेंबाची मात्र पुढच्या वर्षापर्यंत वाट पाहावी लागते...

खिडकी...

खिडकी...
एक चौकोन !
कधी अलीकडचा, कधी पलीकडचा..


दोन विश्वांना जोडणारी एक पोकळी..
साय-फाय चित्रपटांमध्ये पाहिलेला आणि हवाहवासा वाटणारा एक अद्भुत खेळ..


पण तो थरार अनुभवायला कल्पनारंजनाची आवश्यकता वाटणार नाही 
इतकी रंजक असते, 
आपल्या घरातली एक खिडकी !

दूर कुठेतरी पाऊस पडल्याचा सुगंधी निरोप आपल्याला देणारी खिडकी..
शेजारच्या काकूंची फोडणी करपल्याची बातमी देणारीही तीच !


तुपाच्या घमघमाटानिशी आठवडभर आधीच दिवाळीचा उत्साह घेऊन येणारी खिडकी..
चंद्राला लाजवेल असा चमचमत्या कंदीलाचा प्रकाश दाखवणारीही तीच!


सणासुदीला तुळशीत खोवलेल्या उदबत्तीचा दरवळ देणारी खिडकी..
घरी पाहुणे येणार असल्याची आगाऊ सूचना देणारीही तीच !


चिमणीची आनंददायी चिवचिव ऐकवणारी खिडकी..
कबुतरांचं त्रासदायक घुमणं ऐकवणारी ही तीच !

माझ्यासाठी खिडकी म्हणजे रविवार!
एरव्ही सकाळची लगबग पाहता खिडकीत जाऊन 

आपण फार फार तर पाववाल्याला हाक मारतो; 
पण रविवारी..

रविवारी सकाळी आरामात उठून पहिले खिडकीत जावं,
आपल्या आधी कोणी उठलंय का पाहावं,
अर्थात, जग काही थांबलेलं नसतं..


दुपारची कॉफी खिडकीत जाऊन प्यावी,
आपल्या संसारातून क्षणभराचा संन्यास घ्यावा
आणि बाहेरच्या जगातील खिडक्यांवर झाडी मारावी..


कोणाच्या खिडकीची अभ्यासिका झालेली असेल,
कोणा लहानग्याने खिडकीचं डायनिंग टेबल केलेलं असेल,
कोणाच्या खिडकीतल्या ब्रह्मकमळाला छान गुलाबी कळी आलेली दिसेल,
तर कोण्या एका खिडकीची पाखरांनी पाणपोई केली असेल,
एखाद्या खिडकीत लाजत मुरडत चाललेला फोनवरचा संवाद दिसेल,
तर दुसऱ्या एका खिडकीत आजी-आजोबांचं चाललेलं दूर-दर्शन दिसेल...

करता करता नेहमी माझ्या डोक्यात हा विचार येतो, 

की जसं आपण समोरच्या खिडक्यांमधून एखाद्याचं आयुष्य पाहत असतो,
तसं समोरच्या खिडकीतून आपलं आयुष्य पाहायला मिळालं, 

तर काय मज्जा येईल !
समोरच्याच्या नजरेतून स्वतःकडे पाहिल्यासारखंच आहे ना ते ?


शेवटी खिडकी म्हणजे तरी काय?
एक दृष्टिकोनच आहे तो...
ज्याचा त्याचा..
आपला आपला..
वेगळा वेगळा...!

सोमवार, ९ जुलै, २०१८

हेअरकट


जे काम दारू मुलांसाठी करते,
तेच काम एक हेअरकट मुलींसाठी करतो..

अतिशय बेक्कार ब्रेकअप मधून बाहेर काढण्याचं...
एखाद्यावरचं प्रेम व्यक्त करण्याची हिंमत देण्याचं...
नावडत्या गोष्टींना नाकारण्याचं बळ देण्याचं...
क्षुद्रपणाची भावना मनातून काढून टाकण्याचं...
आपण सर्वश्रेष्ठ आहोत, सुंदर आहोत, 
एकदम awesome आहोत, 
अशी भावना निर्माण करण्याचं...
मनातली सगळी किल्मिषं,
सगळी जळमटं धुवून काढण्याचं...
दुनियभरचा सगळा आत्मविश्वास मनाला देण्याचं...

जे काम दारू करते, तेच...
एक मनासारखा हेअरकट....!!

रविवार


रविवार..
एक सुट्टीचा दिवस..
खरंच सुट्टीचा आहे का तो?
असं म्हणतात, 

सुट्टीच्या दिवशी रोजच्यापेक्षा वेगळं काही करावं!
म्हणजे काय?
वेगळं काम?
जास्तीचं काम?


का नाही आपण पूर्ण सुट्टी घेत?

आपल्याला ऑफिसची कामं तर नसतात..
बिझी शेड्युल मुळे रखडलेली इतर कामं करावीत, तर सरकारी कार्यालयं, बॅंका सुद्धा बंद असतात.
बरं, घरी बसून सुद्धा रोजच्या रोज करावी लागणारी कामं असतातच.. तरी पण रिकामेपणा आपल्याला सहन होत नाही.. आपण आयुष्यात काहीच केलं नाही, सगळं उद्यावर ढकलत आलो, असे छळवादी विचार नेमके अशा आरामाच्या दिवशीच डोकं वर काढतात..
पण काहीच केलं नाही, म्हणजे नक्की काय करायला हवं होतं, हे सुद्धा कधी कधी आपल्याला माहीत नसतं.. असंच सकाळचा चहा पिता पिता सुन्न बसलेलो असताना, आपल्याला आपलं शेंडेफळ तंगड्या वर करून मोबाईल घेऊन बसलेलं दिसतं.
आपला पारा चढतो. आपण काहीच केलं नाही तसं त्यानेही करू नये, अशी इच्छा असते आपली, पण आपल्याला तेही धड व्यक्त करता येत नाही..

मग आपण घरातली कामं काढतो.
अतिशय फालतू अशी कामं..

ते कपडे घडी घालून ठेवलेत, तेवढेही कपाटात ठेवता येत नाहीत का रे तुम्हांला, असं म्हणत म्हणत तिकडे जातो, आणि कपाट उघडून त्याने विचारपूर्वक केलेली पसाऱ्याची मांडणी धडाधड फरशीवर आणतो.
किती हा पसारा, काय सापडेल का यात शोधायला गेल्यावर.. ही बघ ही पॅन्ट सापडत नव्हती म्हणून आरडाओरडा चालला होता त्यादिवशी, कुठल्या कोपऱ्यात आहे बघ, टाक ती धुवायला, ही पॅन्ट का नाही घालत हल्ली? टाईट व्हायला लागली? दाखव मला घालून.. किंमत नाही राहिली तुम्हांला कसली.. सगळं आयतं मिळतंय ना.
दोनच मिनिटांपूर्वी मस्त रविवारचा आस्वाद घेणारा तो बिचारा आता, "काय गं कशाला तू सुट्टीच्या दिवशी फुकट कामं काढत बसतेस.." म्हणून चुक चुकत आपल्यासमोर फॅशन परेड करत असतो.
मग आपण कपाट आवरतोय म्हणून घरातल्या इतरांना जेवणाच्या तयारीचे आदेश दिले जातात. सगळे जण चुकचुकत बुडं हलवतात आणि नारळ खवणं, पीठ मळणं वगैरे कामाला लागतात.

यथावकाश, दुपार टळून गेल्यावर,जेवण बनवायला आपण उठतो, आणि ते नीट लावलेलं कपाट पाहून स्वतःला एक शाबासकी देतो. आपण आयुष्यात काहीच केलं नाही, पण सुट्टीच्या दिवशी सुद्धा अराम न करता आपल्या बेशिस्त अपत्याचं कपाट नीट लावलं, हीच काय ती आपली अचिवमेंट असते.
एव्हाना दुसऱ्या अपत्याने धडा घेऊन चुपचाप आपले कपडे ठेवलेले असतात. दिवस मावळेपर्यंत सगळा परिवार आपण एखाद्या गोष्टीने ट्रिगर होऊन एखादं नवीन काम काढणार नाही याची काळजी घेत राहतो.

रात्री जेवल्यावर जरा पाठ टेकायला जावं, तर तिथं कुठेतरी आपल्याला वाचायचं राहून गेलेलं पुस्तक दिसतं, पण आता उद्या सोमवार.. रेल्वेचा पास काढायला उद्या लवकर निघावं लागणार, या विचारांनी आपण चुपचाप पाठ टेकतो.

झालं! संपला रविवार!
देवाने दिलेल्या आणि आपण स्वीकारलेल्या या सोन्यासारख्या दिवसाचा आपण मस्त कामगार दिन केलेला असतो.
रविवार..
खरंतर एक सुट्टीचा दिवस..
या सुट्टीच्या दिवशीसुद्धा आपण स्वस्थ बसून पूर्ण वर्तमानपत्र वाचत नाही,
नवीन पुस्तक वाचायला घेत नाही,
काही नवीन लिहीत नाही,
घरातली एखादी भिंत सजवत नाही,

वेगळी गाणी ऐकत नाही,
एखादा नवा चित्रपट पाहत नाही,
अहो  एवढंच काय, 
सकाळी उशिरा उठलेलो असतो म्हणून 
दुपारी मस्त अंधार करून छान झोपसुद्धा काढत नाही..
का ss ही नाही !
आपण फक्त रद्दी काढतो..
पेपर, प्लॅस्टिक, भंगार आणि स्वप्नांची...

वर्तुळ


वर्तुळ आणि गोल या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, 
हे मला समजायला सहावी उजाडली !

चेंडू म्हणजे गोल,
बांगडी म्हणजे वर्तुळ.

चेंडूसारख्याच गोल पृथ्वीवर आपण राहतो
आणि या गोलावर आपली अनेक वर्तुळं निर्माण करतो.

लहानपणापासूनच आपण या वर्तुळातून त्या वर्तुळात उड्या मारत असतो..
चिप्पी खेळायचो आपण माहितीये ?
त्यात असायचं तसंच काहीसं...
कधी एका वर्तुळात एका पायावर तोल सावरत उभं राहायचं,
कधी दोन वर्तुळांवर एकाच वेळी पाय ठेवायचे,
ज्या वर्तुळात चिप्पी असेल त्याला वगळून पुढे जायचं..

पुढे जायचं आणि काय?
तसंच परत यायचं!!!
वर्तुळासारखंच...
जिथून सुरू होतो तिथेच परत यायचं.

या वर्तुळांना क्रम असतो आणि किंमतही.
वेळोवेळी यातली चिप्पी असणारी वर्तुळं स्कीप करायची असतात, 
नाहीतर आपण एक डाव मागे राहतो.
पुढल्या वर्तुळात जाण्याची संधी हुकते.

ही चिप्पी मात्र प्रत्येकाची आपली आपली वेगळी असते बरं का!
तिची सवय असते आपल्याला.
कधी कोणत्या वर्तुळात टाकायची?
त्यासाठी किती झुकायचं?
किती जोर लावायचा?
किती दूर ढकलायचं?
तिला आपल्याशिवाय कोणी दुसरं नीट हाताळू शकत नाही..

काही सल्ले देणारे भेटतात,
तर काही आपल्याकडून चिप्पीची प्लेसमेंट चुकावी म्हणून त्रास देणारेही..
दोघेही कामाचे नसतात.
कारण त्या चिप्पीचं आपल्या जगातलं वजन फक्त आपण ओळखत असतो!

अर्थात हा सारा खेळ वर्तुळात होतो..
आपण जिथून सुरू केलं, तिथेच परत येतो..
मातीत जन्म घेतो, मातीतच मरतो..
खेळ जिंकतो मात्र तोच,
जो संपूर्ण डाव, मातीची असलेली नाळ न विसरता खेळतो...

पेन्सिल


पेन्सिलीला टोक केलं की सुंदर अक्षरात काहीतरी लिहावंसं वाटतं.
पेनाने ती मजा नाही येत..
इंक पेन ला तोड नाही हे निर्विवाद सत्य !
पण तरीही , पेन्सिल ती पेन्सिल ...


शार्पनर पेक्षा ब्लेडने तिला धार करावी..
मस्त सहा कोन पाडावेत..
अगदी शिसालासुद्धा !


नवी कोरी लांबलचक षटकोनी पेन्सिल..
तिच्यावर लाल काळ्या रंगाचे एक सोडून एक असे पट्टे..
सोनेरी चमचमत्या अक्षरांमध्ये छापलेलं नाव..
सिगारेटीला असते तसे शेवटी काळ्या रंगाचे बट्ट !



सिगारेटीसारखे तेही ओठांत धरण्यासाठी किंवा 
दातांनी चावे घेण्यासाठीच असावे,असे वाटते.
ते कधीच शेवटपर्यंत नीट राहत नाही.
त्यावर दातांचे व्रण उमटतातच !


आपली आई हातावर येता जाता फटके मारते..
सवय जावी म्हणून...
पण तिला कसं कळावं?
की मनातले काही शब्द जे ओठांवर येऊ पाहत असतात; 

पण आपण गिळून टाकत असतो...
त्या शब्दांसाठी पेन्सिलीचं ते शेवटचं टोक,
म्हणजे बुडत्याला काडीचा आधार...


समुद्र

समुद्र किती मोठा असतो ना?
कित्तीतरी गोष्टी पोटात सामावलेला!

त्याच्या लाटांचा पायांच्या तळव्यांना झालेला 
हलकासा स्पर्शसुद्धा त्याची ओढ लावायला पुरेसा होतो.

मग आपण हळूच पुढे सरकतो...
एक पाऊल, दोन पावलं, तीन पावलं...

अगदी पाणी कमरेपर्यंत आलं तरी अजून पुढे जात राहावंसं वाटतं.
आणखी मोठ्या लाटा अंगावर घ्याव्याश्या वाटतात!

अजून पुढे... 
अजून थोडं पुढे जाऊन परत जाऊ असं आपण स्वतः लाच सांगतो...

समुद्र आपल्याला खुणावत राहतो,
शुभ्र फेसळलेल्या आणखी मोठ्या लाटांची लालूच दाखवत राहतो..

आपल्याही नकळत आपल्याला त्या खाऱ्या पाण्याची नशा लागते.
डोळे जळजळू लागले, 
तोंड खारट झालं, 
कपड्यात गेलेल्या वाळूने शरीर चुरचुरू लागलं, 
तरी आपल्याला त्या पाण्यातून बाहेर यावंसं वाटत नाही.

मागे वळून पाहावं तर किनारा खूप लांब राहिला असं वाटतं 
आणि क्षितीजाच्या पलीकडचा समुद्र जवळचा वाटू लागतो...

पसारा

कधीतरी आपण खूप वैतागतो 
आणि घर आवरायला घेतो.

मोठा मोठा कचरा पहिले बाजूला होतो,
जळमटं झडून पडतात,
पंखे, लाईट्स साफ होतात,
ट्यूबलाईट्सचा नेहमीसारखाच प्रकाश आपल्याला उगाचच लख्ख वाटू लागतो...


गेल्या वर्षी फ्रेम करण्यासाठी बाजूला काढून ठेवलेले फोटो 
त्यावेळी रिकाम्या केलेल्या आणि आत्ता ऊतू जाणाऱ्या ड्रॉवरच्या तळाशी सापडतात,

थोडे उसवलेले कपडे संध्याकाळी बाहेर पडू तेव्हा शिवायला टाकायचे 
म्हणून एका निळ्या पिशवीत भरले जातात,

अंगठा तुटलेली आपली आवडती चप्पल मोच्याकडे द्यायची 
म्हणून मनाशी पक्कं ठरवलं जातं...

गाद्या झटकल्या जातात, चादरी नवीन येतात!

आणि मग एक फक्कड असा चहा घेऊन 
मागच्या वेळी घर आवरताना तयार झालेल्या पिशव्या,गाठोडी उलगडली जातात..

"केवढ्या गोष्टी साठल्या आहेत, 
काही कामाच्या नसलेल्या गोष्टी आता टाकूनच द्यायच्या, 
सगळा कचरा कमी करायचा", 
असं ठामपणे मनाशी ठरवून आपण त्या पसाऱ्यात हात घालतो,
आणि...☺

शुक्रवार, ६ जुलै, २०१८

काम...

काम...

आवडीचं असलं की आपण हसत हसत करतो,
आपल्या फायद्याचं असलं की त्या होणाऱ्या फायद्याकडे लक्ष ठेवून करतो,
आपल्याला भरपूर पैसा मिळवून देणारं असेल की मग बाकी सारं काही विसरून, 
होतील ते कष्ट स्वीकारून, 
क्वचित आपल्या जवळच्यांना दुःखावून, 
रोजच्या रोज, 
रडत खडत का होईना, 
पण करतो..

आपल्या प्रत्येकाच्या वाट्याला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात तऱ्हेतऱ्हेची कामं येतात.
कधी कधी त्यातून आपल्याला काहीच मिळणार नसतं.. 
पण केली नाहीत तर ओरडा किव्वा शिक्षा मात्र मिळणार असते..
तर कोणालाच मनस्ताप नको म्हणून आपण ती कामं सुद्धा करतो..

तर अशी खूप कामं मीसुद्धा कंटाळून किरकिरत करायचे.
एक चांगलं होतं की मला मी वाचनाची प्रचंड आवड होती 
आणि ते आक्षेपार्ह नसल्याने मला भरपूर पुस्तकं वाचायला मिळाली.
त्यातलंच एक म्हणजे - 
" चिकन सूप फॉर दि सोल "...
त्यातल्या एका छोट्याश्या गोष्टीत मी एक वाक्य वाचलेलं आठवतं,
" एखादं काम जर आपल्याला करावंच लागणार असेल, 
तर ते कुरकुरत करण्यापेक्षा हसत हसत करायला हवं "

आयुष्याची १६ वर्षं पूर्ण न झालेल्या मुलीला या वाक्याने किती फरक पडावा?
मला मात्र त्या वाक्याने एका नवीन नजरेने पाहायला लावलं स्वतःकडे आणि जगाकडे...

तेव्हापासून रोज रोज करावी लागणारी कामं गाणी गात गात करू लागले..
त्या कामातला कंटाळवणेपणा, रटाळपणा, एकसुरीपणा निघून गेला..
कारण काम तेच तेच असलं तरी गाणी रोज नवीन असायची ना!

कधीतरी आपल्यामधला कामसू राक्षस जागा होतो 
आणि आपण स्वतःहून खूप दिवस रखडलेलं काम करायला घेतो आणि संपवतो , 
तेव्हा लक्षात येतं,
अरेच्चा ! फक्त १५ मिनिटांचं काम होतं, हे आपण आधीच का नाही केलं?

आणि गंम्मत म्हणजे त्याच रात्री आपण आपल्या भावाशी 
झोपताना लाईट कोणी बंद करायची या गोष्टीवरून वाद घालतो...
🤣

पाऊस...

पाऊस आवडतो का तुम्हाला ?
उत्तर हो असणार अर्थातच!
मला खात्री आहे.


आता प्रश्न थोssडासा बदलते हं...
"पावसाळा" आवडतो का तुम्हाला ?
आता सगळे पट्कन हो नाही म्हणणार,
थोडा विचार कराल..


रोज नेमका ऑफिस ला जायला बाईक बाहेर काढल्यावर येणारा पाऊस आठवेल...


ट्रेन मध्ये नेमकी दारात जागा मिळाल्यावर धो धो कोसळून तुम्हाला चिंब करणारा पाऊस आठवेल...


आज काही पावसाचं लक्षण दिसत नाही, ऊन पडलंय, 
असं समजून आपण छान ऑफ व्हाईट पॅन्ट घालतो 
आणि बाहेर पडताच रस्त्यावरची सुकलेली माती भिजवून 
तिचे शिंतोडे त्या पँटवर उडवणारा 
श्रावणातला खोडकर पाऊस...

पावसाळ्याची हीच तर मजा आहे !
तो आपले ठरलेले बेत उधळून लावतो..
आणि अनेकवेळा ठरवूनदेखील करायच्या राहून गेलेल्या गोष्टी करायला वेळ देतो...

मी पाहिलंय,
सुट्टीसाठी ट्रॅफिकचं कारण एकवेळ कोणी ऐकून घेणार नाही,
कडक ऊन्हाचंही नाही;
पण पाऊस?
पाऊस कोणालाच चुकत नाही..
''केवढा पाऊस पडतोय!! कंटाळा आलाय",
हे कारण कुठेही सहज खपून जातं..
कारण तो कंटाळाही कोणालाच चुकत नाही..



कंटाळा पावसाचा नसतो,
खरंतर इतकं छान वातावरण असताना कराव्या लागणाऱ्या कामाचा असतो...

अशा वेळी ना, 
सरळ बाईकला किक मारावी
आणि हायवेला लागावं..
कितीही काँक्रिटचं जंगल असूदे आजूबाजूला,
आपल्याला मात्र त्यातून हळूच डोकावणारा पोपटी रंगच खुणावतो..
आख्ख्या रुक्ष दिवसाची तहान भागवणारा रंग, पोपटी..
हिरवा नाही बरं.. पोपटीच!
आभाळाच्या करड्या रंगावर चमकून उठणारा पोपटी...


पण एक मिनिट,
रस्त्यावर लक्ष असूदे हं...
बाईक चालवतोय आपण!
☺