शनिवार, २८ मार्च, २०२०

रिमाईंडर्स...


किनाऱ्यावरची पाण्याची एक लाट जशी परत जाताना आपल्या पायाखालची वाळू सरकवते,
तशी काही माणसं येतात आयुष्यात,
आणि परत जाताना आपल्या पायाखालची जमीन काढून नेतात..

पायाच्या बोटांमध्ये काही टोचरे कण राहून जातात वाळूचे..

आपल्याला सहज शक्य असतं, ते कण साफ करणं, पण आपण तसं करत नाही..
आपण ते ठेवून देतो तसेच,
वेळ आल्यावर आपल्याला स्वतःला जाणीव करून द्यायला,
की नक्की काय चूक केली होती त्या व्यक्तीने,
आणि कशी आपण चूक केली होती तिच्यावर विश्वास ठेवून..

आपल्याला आपल्याच चुका लक्षात ठेवायलासुद्धा रिमाईंडर ठेवावे लागतात..

त्या व्यक्तीने दिलेल्या क्लेशाहूनही हे रिमाईंडर्स आपल्याला जास्त त्रास देत असतात..
आपल्या आयुष्याची माती करत असतात..

आपल्याला सहज शक्य असतं,
ते वाळूचे टोचरे कण साफ करणं..
का नाही करत आपण?


- समिक्षा साळुंके
- २६-०३-२०२० 

शुक्रवार, २७ मार्च, २०२०

माती...


आपलं नशीब चांगलं,
म्हणून मातीत माखून आल्यावर 

आधी पाठीत धपाटा घालून 
मग हात पाय धुवायला पाठवणारी आई आपल्याला मिळाली.

नाहीतर, स्वतःहून मातीत लोळायला पाठवून, 
नंतर हाय फाईव्ह वगैरे देऊन दाग अच्छे है म्हणणारी आई मिळाली असती,
तर कदाचित आपली पिढीच पृथ्वीवरची शेवटची पिढी असती..

खरं तर, मातीशी आपला एक अंतर्बाह्य संबंध आहे.
कारण जितकी अंगाला लागली,
तेवढीच पोटात सुद्धा गेली आहे..
हो, खरंच..! 
मस्करी नाही...
पाळणाघरात दुपारी झोप येत नसताना, 
भिंतीजवळ झोपायची संधी मिळाली की 
चुन्याच्या भिंतीचे पोपडे काढून हळूच मटकावलेत आपण..
उन्हाळ्याच्या सुट्टीत, गच्चीत धान्य वाळवायला टाकल्यावर, 
त्यातले काळ्या मातीचे बारीक बारीक खडे वेचून खाणारे राखणदारसुद्धा आपणच...
भुईमूगाच्या शेंगा खाताना ज्यांच्यावर जास्त माती असायची, 
अशा शेंगा सापडल्या की लॉटरी लागल्यासारखे चेहरे व्हायचे आपले..
पाटीवरची पेन्सिल लिहिण्यात कमी आणि आपल्या दातांखाली जास्त झिजायची...
पाचवीत गेल्यावर डॉक्टर डॉक्टर खेळताना, 
कॅल्शिअम कमी आहे हे निमित्त फक्त फळ्यावरच्या खडूच्या बनवलेल्या 
सुबक आणि रंगीबेरंगी गोळ्या खाण्यासाठीच तर होतं..
मला आठवतंय, मी अकरावीत केळकरला कॉलेजमध्ये जाताना 
रेल्वेच्या पुलावर एक माणूस पाटीवरच्या पेन्सिली विकायचा..
कँटीन मधला वडापाव नाही खाल्ला कधी पण 
त्याच्याकडून दर महिन्याला एक जुडी घेऊन जायचे मी खायला..

आता मोठे झाल्यावर, हे पहिल्या पावसातला मातीचा गंध वगैरे प्रकार समजले..

लहानपणी तो सुगंध म्हणजे पहिल्या पावसाची चाहूल बिहूल नव्हती काही.. 
तो होता पावसात कायदेशीररीत्या भिजण्याचा परवाना...
आणि चिखलात उड्या मारून, 
ओळखू येणार नाही एव्हढे बरबटलो, 
तरीही कोणतीही कारवाई होणार नाही, हे अभय!

कागदी होड्या-बिड्या तर आमचे आई-बाबाच 
त्यांचा नॉस्टॅल्जिया शमवायला पाण्यात सोडायचे..

मातीबद्दल वाटणारी तेव्हाची ओढ वेगळी होती..
तिची खरी किंमत तर आता मोठं झाल्यावर कळू लागली.

अख्खं बालपण मातीत घालवलं..
तेव्हा खूप खेळलो नाही असं नाही..
तरीही, आता असंच वाटत राहतं,
की शाळेच्या मैदानातल्या त्या लाल मातीत खूप खेळून घायला पाहिजे होतं..


- समिक्षा साळुंके
- २६-०३-२०२०

गुरुवार, २६ मार्च, २०२०

पंखा



पंखा म्हटलं, की सगळ्यात आधी आठवते रात्र...

अगदी लहान असताना, 
जेव्हा अर्थात ही ३x६ ची जादुई खिडकी अजून आमच्या हातात काय, 
पण कोणाच्या डोक्यातही आली नव्हती, 
तेव्हा...रात्री झोप लागण्यासाठी, माझ्याकडे दोनच पर्याय होते..
एक म्हणजे भूगोलाचं पुस्तक वाचायला घेणं
किंवा दुसरा म्हणजे अंथरुणावर पाठ टेकून वर गोल गोल फिरणाऱ्या पंख्याकडे टक लावून बघत राहणं...
अनेकदा ती हवा डोळ्यांत जाऊन जाऊन डोळे मिटायचे.
पण काही वेळा त्यानेही झोप लागत नसे..
तेव्हा मी एक खेळ खेळायचे...

महाभारतातला अर्जुन जसा पक्ष्याच्या डोळ्यांवर लक्ष केंद्रित करायचा,
 तसं मी पंख्याच्या  केंद्रबिंदू वर लक्ष केंद्रित करायचे 
आणि असंच माझ्या मीच तयार केलेल्या माझ्या द्रोणाचार्यांना सांगायचे,
मला फक्त आणि फक्त पंख्याच्या मध्यातला तो पांढरा डाग दिसत आहे.. 
द्रोणाचार्य बोलायचे शाब्बास.!
आणि मी मनातल्या मनात तीर मारणार 
एवढ्यात मी टक लावून बघत असलेला तो पंखा गायब व्हायचा... 
आणि मग काही क्षण फक्त अवकाश दिसायचं...
त्या काही क्षणांपुरता श्वास रोखला जायचा..
आणि श्वास सोडला की पुन्हा पंखा दिसायला लागायचा..

कदाचित तेव्हा सगळेच जण हा खेळ खेळत असतील, 
पण मला मी जाम स्पेशल वाटायचे, की मी नुसतं नजरेने पंखा गायब करू शकते...
आणि मग मला ते ४-५ क्षण मिळवण्याची चटकच लागली.. 

थोडी मोठी झाल्यावर मी पंखा जास्तीत जास्त वेळ गायबच राहील यासाठी प्रयत्न करू लागले... 
आणि जसं जसं मी हे जाणून बुजून करू लागले, 
तसा तसा हा पंखा खूप प्रयत्न करूनही गायब होईनासा झाला.

तो गायब होण्यासाठी डोळे एका विशिष्ट प्रकारे मिटायला लागतात.
लहानपणी जे सहज होत होतं, ते जाणीवपूर्वक करायला गेल्यावर होईनासं झालं.. 
अगदी आत्तापर्यंत मला समजत नव्हतं की असं का होतंय.!
आपल्याला पंखा गायब होण्यामागचं गणित कळलंय, पण तरीही जमत का नाहीये..

काही महिन्यांपूर्वी अचानक खूप खूप विचार डोक्यात असताना झोप येत नव्हती तेव्हा समजलं.. की 
पंखा गायब झाल्यानंतर तो परत आणण्याची एकच चावी होती, 
ते म्हणजे भानावर येणे..
याचाच अर्थ असा की, पंखा गायब व्हायचा तेव्हा माझं भान हरपलेलं असायचं.. 
मी हरवलेले असायचे, 
आणि तेव्हा आयुष्यात एवढे प्रश्नच नव्हते की दुसरे विचार मनात येत राहतील 
आणि आले तरी मी ते मनावर घेईन...

पण आता?
आता वयानुरूप इतके प्रश्न, इतके विचार डोक्यात असतात, 
की मला रात्री झोपतानासुद्धा चार क्षण मोकळे मिळत नाहीत तो पंखा गायब करायला..
चार क्षण सुद्धा मी स्वतःला हरवून देऊ शकत नाहीये.. 
सतत विचार आहेत मनात..
सतत भान आहे परिस्थितीचं..
सतत जाणीव आहे आयुष्यातल्या समस्यांची..
आयुष्यात खूप बदल झालेत आता...
तो पांढरा डाग असलेला पंखा सासरी नसल्यामुळेही जमत नसेल कदाचित..
तरीही , 
अजूनही , 
मी रोज रात्री प्रयत्न करते, 
अंथरुणावर पाठ टेकल्यावर, 
त्या डोक्यावरच्या पंख्याला गायब करण्याचा..

समिक्षा साळुंके
२५-०३-२०२०

बुधवार, ११ जुलै, २०१८

थेंब

थेंब...
या शब्दातच किती ओलावा आहे!

'थ' चं टप्पोरं डोकं,
त्यावर डोंगरउतारासारखी मात्रा,
त्यावर दवबिंदू सारखा अनुस्वार !

फक्त शब्दरचनेच्या निमित्ताने सोबतीला आलेला ब... 
अनुस्वाराच्या वर्षावात भिजायला आल्यासारखा...

काय मजा आहे ना?
तर असा हा एक थेंब!
आपल्या प्रत्येकाचा याबाबतीतला 
आपला आपला असा अनुभव असणार.

कोण्या एका द्रवाचा थेंब..

कोणा दुष्काळग्रस्तासाठी पाण्याची ओंजळ,
कोणा अपघातग्रस्तासाठी लाल औषधाचा बोळा, 
कोणा सैनिकांसाठी शत्रूच्या रक्ताची धार,
कोणा प्रियकरासाठी प्रेयसीच्या अश्रूंचा बांध,
कोणा कष्टकऱ्यासाठी चहाचे दोन घोट,
कोणा सोवळेकरासाठी गोमूत्राचा शिडकावा,
कोणा नवजातासाठी आईचा पान्हा,
तर कोणा वैकुंठवासीसाठी गंगाजलाचे चार थेंब...

थेंबाथेंबांनी बनलेले हे सर्व एकक,
ज्याची त्याची तहान भागवून जातात..

माझी तहान भागवणारा एकच !
पावसाचा माझ्या अंगावर पडणारा पहिला-वहिला थेंब!

कातडीसुद्धा काढून ठेवावी असं वाटायला लावणारा उन्हाळा 
म्हणजे त्या थेंबाच्या आगमनाचीच सूचना आहे, 
असं समजून चालायचं, 
की उन्हाळ्याचा त्रास जर कमी होतो.

मग एक पिटुकला थेंब येतो आकाशातून,
एक गारेगार संदेश घेऊन..
आपल्या सगळ्या सोबत्यांना बोलावतो जमिनीवर खेळायला..
आकाशातून बाबा गर्जत असतात, 
आई कडाडत असते,
पण हे थेंब काही त्यांचा खेळ थांबवत नाहीत.

ते कधी हलके हलके वाऱ्यावर तरंगत येतात,
कधी एकमेकांशी स्पर्धा असल्यासारखे धावत येतात,
कधी अलगद जाऊन गवतात लपतात,
तर कधी जोरदार येऊन कातळावर आदळतात..
पडतात, धडपडतात, कधी कधी तर वाहून जातात, 
पण मस्ती करायची थांबवत नाहीत.

असे हे खोडकर थेंब..
माझे खूप खूप लाडके..

पण आकाशातले बाबा पुढे जायला लागले, 
की निमूटपणे त्यांच्यामागे जातात!
पुन्हा येतात, 
पुन्हा पुन्हा येतात..
मागे बऱ्याच आठवणीही ठेवून जातात..


त्या पहिल्या वहिल्या थेंबाची मात्र पुढच्या वर्षापर्यंत वाट पाहावी लागते...

खिडकी...

खिडकी...
एक चौकोन !
कधी अलीकडचा, कधी पलीकडचा..


दोन विश्वांना जोडणारी एक पोकळी..
साय-फाय चित्रपटांमध्ये पाहिलेला आणि हवाहवासा वाटणारा एक अद्भुत खेळ..


पण तो थरार अनुभवायला कल्पनारंजनाची आवश्यकता वाटणार नाही 
इतकी रंजक असते, 
आपल्या घरातली एक खिडकी !

दूर कुठेतरी पाऊस पडल्याचा सुगंधी निरोप आपल्याला देणारी खिडकी..
शेजारच्या काकूंची फोडणी करपल्याची बातमी देणारीही तीच !


तुपाच्या घमघमाटानिशी आठवडभर आधीच दिवाळीचा उत्साह घेऊन येणारी खिडकी..
चंद्राला लाजवेल असा चमचमत्या कंदीलाचा प्रकाश दाखवणारीही तीच!


सणासुदीला तुळशीत खोवलेल्या उदबत्तीचा दरवळ देणारी खिडकी..
घरी पाहुणे येणार असल्याची आगाऊ सूचना देणारीही तीच !


चिमणीची आनंददायी चिवचिव ऐकवणारी खिडकी..
कबुतरांचं त्रासदायक घुमणं ऐकवणारी ही तीच !

माझ्यासाठी खिडकी म्हणजे रविवार!
एरव्ही सकाळची लगबग पाहता खिडकीत जाऊन 

आपण फार फार तर पाववाल्याला हाक मारतो; 
पण रविवारी..

रविवारी सकाळी आरामात उठून पहिले खिडकीत जावं,
आपल्या आधी कोणी उठलंय का पाहावं,
अर्थात, जग काही थांबलेलं नसतं..


दुपारची कॉफी खिडकीत जाऊन प्यावी,
आपल्या संसारातून क्षणभराचा संन्यास घ्यावा
आणि बाहेरच्या जगातील खिडक्यांवर झाडी मारावी..


कोणाच्या खिडकीची अभ्यासिका झालेली असेल,
कोणा लहानग्याने खिडकीचं डायनिंग टेबल केलेलं असेल,
कोणाच्या खिडकीतल्या ब्रह्मकमळाला छान गुलाबी कळी आलेली दिसेल,
तर कोण्या एका खिडकीची पाखरांनी पाणपोई केली असेल,
एखाद्या खिडकीत लाजत मुरडत चाललेला फोनवरचा संवाद दिसेल,
तर दुसऱ्या एका खिडकीत आजी-आजोबांचं चाललेलं दूर-दर्शन दिसेल...

करता करता नेहमी माझ्या डोक्यात हा विचार येतो, 

की जसं आपण समोरच्या खिडक्यांमधून एखाद्याचं आयुष्य पाहत असतो,
तसं समोरच्या खिडकीतून आपलं आयुष्य पाहायला मिळालं, 

तर काय मज्जा येईल !
समोरच्याच्या नजरेतून स्वतःकडे पाहिल्यासारखंच आहे ना ते ?


शेवटी खिडकी म्हणजे तरी काय?
एक दृष्टिकोनच आहे तो...
ज्याचा त्याचा..
आपला आपला..
वेगळा वेगळा...!

सोमवार, ९ जुलै, २०१८

हेअरकट


जे काम दारू मुलांसाठी करते,
तेच काम एक हेअरकट मुलींसाठी करतो..

अतिशय बेक्कार ब्रेकअप मधून बाहेर काढण्याचं...
एखाद्यावरचं प्रेम व्यक्त करण्याची हिंमत देण्याचं...
नावडत्या गोष्टींना नाकारण्याचं बळ देण्याचं...
क्षुद्रपणाची भावना मनातून काढून टाकण्याचं...
आपण सर्वश्रेष्ठ आहोत, सुंदर आहोत, 
एकदम awesome आहोत, 
अशी भावना निर्माण करण्याचं...
मनातली सगळी किल्मिषं,
सगळी जळमटं धुवून काढण्याचं...
दुनियभरचा सगळा आत्मविश्वास मनाला देण्याचं...

जे काम दारू करते, तेच...
एक मनासारखा हेअरकट....!!

रविवार


रविवार..
एक सुट्टीचा दिवस..
खरंच सुट्टीचा आहे का तो?
असं म्हणतात, 

सुट्टीच्या दिवशी रोजच्यापेक्षा वेगळं काही करावं!
म्हणजे काय?
वेगळं काम?
जास्तीचं काम?


का नाही आपण पूर्ण सुट्टी घेत?

आपल्याला ऑफिसची कामं तर नसतात..
बिझी शेड्युल मुळे रखडलेली इतर कामं करावीत, तर सरकारी कार्यालयं, बॅंका सुद्धा बंद असतात.
बरं, घरी बसून सुद्धा रोजच्या रोज करावी लागणारी कामं असतातच.. तरी पण रिकामेपणा आपल्याला सहन होत नाही.. आपण आयुष्यात काहीच केलं नाही, सगळं उद्यावर ढकलत आलो, असे छळवादी विचार नेमके अशा आरामाच्या दिवशीच डोकं वर काढतात..
पण काहीच केलं नाही, म्हणजे नक्की काय करायला हवं होतं, हे सुद्धा कधी कधी आपल्याला माहीत नसतं.. असंच सकाळचा चहा पिता पिता सुन्न बसलेलो असताना, आपल्याला आपलं शेंडेफळ तंगड्या वर करून मोबाईल घेऊन बसलेलं दिसतं.
आपला पारा चढतो. आपण काहीच केलं नाही तसं त्यानेही करू नये, अशी इच्छा असते आपली, पण आपल्याला तेही धड व्यक्त करता येत नाही..

मग आपण घरातली कामं काढतो.
अतिशय फालतू अशी कामं..

ते कपडे घडी घालून ठेवलेत, तेवढेही कपाटात ठेवता येत नाहीत का रे तुम्हांला, असं म्हणत म्हणत तिकडे जातो, आणि कपाट उघडून त्याने विचारपूर्वक केलेली पसाऱ्याची मांडणी धडाधड फरशीवर आणतो.
किती हा पसारा, काय सापडेल का यात शोधायला गेल्यावर.. ही बघ ही पॅन्ट सापडत नव्हती म्हणून आरडाओरडा चालला होता त्यादिवशी, कुठल्या कोपऱ्यात आहे बघ, टाक ती धुवायला, ही पॅन्ट का नाही घालत हल्ली? टाईट व्हायला लागली? दाखव मला घालून.. किंमत नाही राहिली तुम्हांला कसली.. सगळं आयतं मिळतंय ना.
दोनच मिनिटांपूर्वी मस्त रविवारचा आस्वाद घेणारा तो बिचारा आता, "काय गं कशाला तू सुट्टीच्या दिवशी फुकट कामं काढत बसतेस.." म्हणून चुक चुकत आपल्यासमोर फॅशन परेड करत असतो.
मग आपण कपाट आवरतोय म्हणून घरातल्या इतरांना जेवणाच्या तयारीचे आदेश दिले जातात. सगळे जण चुकचुकत बुडं हलवतात आणि नारळ खवणं, पीठ मळणं वगैरे कामाला लागतात.

यथावकाश, दुपार टळून गेल्यावर,जेवण बनवायला आपण उठतो, आणि ते नीट लावलेलं कपाट पाहून स्वतःला एक शाबासकी देतो. आपण आयुष्यात काहीच केलं नाही, पण सुट्टीच्या दिवशी सुद्धा अराम न करता आपल्या बेशिस्त अपत्याचं कपाट नीट लावलं, हीच काय ती आपली अचिवमेंट असते.
एव्हाना दुसऱ्या अपत्याने धडा घेऊन चुपचाप आपले कपडे ठेवलेले असतात. दिवस मावळेपर्यंत सगळा परिवार आपण एखाद्या गोष्टीने ट्रिगर होऊन एखादं नवीन काम काढणार नाही याची काळजी घेत राहतो.

रात्री जेवल्यावर जरा पाठ टेकायला जावं, तर तिथं कुठेतरी आपल्याला वाचायचं राहून गेलेलं पुस्तक दिसतं, पण आता उद्या सोमवार.. रेल्वेचा पास काढायला उद्या लवकर निघावं लागणार, या विचारांनी आपण चुपचाप पाठ टेकतो.

झालं! संपला रविवार!
देवाने दिलेल्या आणि आपण स्वीकारलेल्या या सोन्यासारख्या दिवसाचा आपण मस्त कामगार दिन केलेला असतो.
रविवार..
खरंतर एक सुट्टीचा दिवस..
या सुट्टीच्या दिवशीसुद्धा आपण स्वस्थ बसून पूर्ण वर्तमानपत्र वाचत नाही,
नवीन पुस्तक वाचायला घेत नाही,
काही नवीन लिहीत नाही,
घरातली एखादी भिंत सजवत नाही,

वेगळी गाणी ऐकत नाही,
एखादा नवा चित्रपट पाहत नाही,
अहो  एवढंच काय, 
सकाळी उशिरा उठलेलो असतो म्हणून 
दुपारी मस्त अंधार करून छान झोपसुद्धा काढत नाही..
का ss ही नाही !
आपण फक्त रद्दी काढतो..
पेपर, प्लॅस्टिक, भंगार आणि स्वप्नांची...