शुक्रवार, २७ मार्च, २०२०

माती...


आपलं नशीब चांगलं,
म्हणून मातीत माखून आल्यावर 

आधी पाठीत धपाटा घालून 
मग हात पाय धुवायला पाठवणारी आई आपल्याला मिळाली.

नाहीतर, स्वतःहून मातीत लोळायला पाठवून, 
नंतर हाय फाईव्ह वगैरे देऊन दाग अच्छे है म्हणणारी आई मिळाली असती,
तर कदाचित आपली पिढीच पृथ्वीवरची शेवटची पिढी असती..

खरं तर, मातीशी आपला एक अंतर्बाह्य संबंध आहे.
कारण जितकी अंगाला लागली,
तेवढीच पोटात सुद्धा गेली आहे..
हो, खरंच..! 
मस्करी नाही...
पाळणाघरात दुपारी झोप येत नसताना, 
भिंतीजवळ झोपायची संधी मिळाली की 
चुन्याच्या भिंतीचे पोपडे काढून हळूच मटकावलेत आपण..
उन्हाळ्याच्या सुट्टीत, गच्चीत धान्य वाळवायला टाकल्यावर, 
त्यातले काळ्या मातीचे बारीक बारीक खडे वेचून खाणारे राखणदारसुद्धा आपणच...
भुईमूगाच्या शेंगा खाताना ज्यांच्यावर जास्त माती असायची, 
अशा शेंगा सापडल्या की लॉटरी लागल्यासारखे चेहरे व्हायचे आपले..
पाटीवरची पेन्सिल लिहिण्यात कमी आणि आपल्या दातांखाली जास्त झिजायची...
पाचवीत गेल्यावर डॉक्टर डॉक्टर खेळताना, 
कॅल्शिअम कमी आहे हे निमित्त फक्त फळ्यावरच्या खडूच्या बनवलेल्या 
सुबक आणि रंगीबेरंगी गोळ्या खाण्यासाठीच तर होतं..
मला आठवतंय, मी अकरावीत केळकरला कॉलेजमध्ये जाताना 
रेल्वेच्या पुलावर एक माणूस पाटीवरच्या पेन्सिली विकायचा..
कँटीन मधला वडापाव नाही खाल्ला कधी पण 
त्याच्याकडून दर महिन्याला एक जुडी घेऊन जायचे मी खायला..

आता मोठे झाल्यावर, हे पहिल्या पावसातला मातीचा गंध वगैरे प्रकार समजले..

लहानपणी तो सुगंध म्हणजे पहिल्या पावसाची चाहूल बिहूल नव्हती काही.. 
तो होता पावसात कायदेशीररीत्या भिजण्याचा परवाना...
आणि चिखलात उड्या मारून, 
ओळखू येणार नाही एव्हढे बरबटलो, 
तरीही कोणतीही कारवाई होणार नाही, हे अभय!

कागदी होड्या-बिड्या तर आमचे आई-बाबाच 
त्यांचा नॉस्टॅल्जिया शमवायला पाण्यात सोडायचे..

मातीबद्दल वाटणारी तेव्हाची ओढ वेगळी होती..
तिची खरी किंमत तर आता मोठं झाल्यावर कळू लागली.

अख्खं बालपण मातीत घालवलं..
तेव्हा खूप खेळलो नाही असं नाही..
तरीही, आता असंच वाटत राहतं,
की शाळेच्या मैदानातल्या त्या लाल मातीत खूप खेळून घायला पाहिजे होतं..


- समिक्षा साळुंके
- २६-०३-२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा